पंखांच्या आठवणी – हरवलेल्या गवताळ अधिवासाची कहाणी

पंखांच्या आठवणी - हरवलेल्या गवताळ अधिवासाची कहाणी 



मसला खुर्द—तुळजापूर तालुक्यातलं एक छोटंस गाव. मातीच्या भिंती, कुडाचं छप्पर, आणि अंगणात चिंचेचं झाड. माझं बालपण याच साधेपणात, पण निसर्गाच्या सान्निध्यात घडलं.—एक गरीब शेतकरी, पावसावर अवलंबून शेती, वर्षभर कष्ट, आणि तरीही हातात फारसं काही उरत नसे. पण मला वाटत त्या जमिनीशी जोडलेली माणसं, श्रमाचं मोल, आणि निसर्गाशी असलेलं नातं आतून काहीतरी घडवत होतं. सासुरे (बार्शी) गावी मामाबरोबर जनावरं चारायला जाताना माळरानावर एक वेगळंच जग दिसायचं. माळचिमणी म्हणजेच लार्क्सच्या चिवचिवाटात, टिटवीच्या सावध नजरेत, आणि कोल्हेकुईच्या गूढ अस्तित्वात काहीतरी बोलवणं होतं. त्या आवाजांनी मला घडवल — शब्दांशिवाय, पण गहिरं. वन्यजीव हा शब्द तेव्हा माहिती नव्हता.

बैलगाडीत चारा वाहून नेणे हे भविष्यात फक्त आठवणीत राहणार अस दिसते आहे.

रस्ते नव्हते तेव्हा ह्या परिसराच एक वेगळंच रूप दिसायच. लहानपणी मी आजोबांसोबत शेतावर जायचो, एका शुरासारखा आव आणून काळवीटांच्या हल्ल्यांपासून पिकं वाचवायला. तेव्हा शेत गाठणं सोपं नव्हतं—मातीचे कच्चे रस्ते, वाऱ्यात डुलणारी उंच ज्वारी, आणि काळोख्या रात्रीचं गूढ आवरण. आम्ही फक्त चालत नव्हतो, ऐकत होतो—पानांची सळसळ, लांबून येणारा कोल्ह्याचा आवाज, आणि ओलसर जमिनीचा धपकारा. त्या वेळचे खेळ साधे, पण गावरान होते: विहिरी मध्ये पोहण, मित्रांसोबत सुर परंब्या खेळणं, आणि बैलगाडीत कडबा आणण. शेतात जनावर चारायला येणारे, धारा काढताना, शेत कुळवताना, आणि नांगरताना एकमेकाच्या साथीन शेतकऱ्यांनी एकत्र गायलेली गाणी, त्यांच हास्य, त्यांची जीवनशैली—सगळं मातीसही एकरूप असल्यासारख वाटायचं. आणि मग होता देवीचा माळ — आई तुळजा भवानी देवतेचं पवित्र स्थान. तिथं पोहोचायला तास लागायचा, लवणातून चढ-उताराच्या शेतातून चालत जायचं. आज ती गाडीने फक्त पाच मिनिटांची गाडीची वाट झाली आहे. रस्त्यांनी अंतर कमी केलं, पण शांतता लांबवली. तेव्हा फारसं कुणी त्या दूरच्या शेतांमध्ये पीक घ्यायला तयार नव्हतं. आता वाहनं आणि रस्ते आहेत, म्हणून तीच शेतं प्रचंड महाग झाली आहेत आणि त्यातपण चढाओढ तिथला विकास करण्याची. 

कालव्यांच्या जाळ्यानी दख्खन पठारावरील जमीन वापराचा संपूर्ण चेहराच बदलून टाकला.

शाळा सोलापूरमध्ये झाली. अभ्यासापेक्षा जनावर, माती अशा गोष्टीतच जास्त रस होता. त्यामुळ एकदा गावाला गेल की शाळेला (दमाणी हायस्कूल) येऊ वाटायच नाही. पण एकदा घरी शाळा सोडण्याची नोटिस मिळाल्यानंतर जरा सीरियसनेस आला. आईने आणि मी सुद्धा कधी “वन्यजीव शास्त्रज्ञ” होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. पण आईच्या पाठिंब्यामुळे मी प्राणीशास्त्रात मास्टर्स पूर्ण केलं. पुणे विद्यापीठात केलेल्या बायोइन्फोर्मेटिक्स च्या डिप्लोमा मुळे BNHS ह्या भारतातल्या अग्रगण्य संस्थेत काम मिळाल. तेव्हा जाऊन कळल की मी ज्या भागातून आलोय तिथला माळढोक पक्षी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतोय. सुरुवातीला एक दोन वर्ष खूप वाचन केल आणि लक्षात आल की आपल्याला किती कमी ज्ञान तेही आपल्या भागाच. आणि मग ठरवलं—पीएच.डी. करायची, तीही दख्खनचे पठार ह्या गवताळ प्रदेशातील पक्षी जीवनावर . जिथे माझं बालपण गेलं, तिथेच पक्ष्यांच्या अधिवासांचा अभ्यास करायचा अशी मनाशी खूणगाठ बांधली. माझ्या पीएच.डी.चा प्रवास सोपा नव्हता. माझे मार्गदर्शक डॉ. असद रहमानी यांनी सुरुवातीला नकार दिला आणि म्हणाले “तू अजून पीएच.डी. साठी परिपक्व नाहीस.” पण शिस्त, अभ्यास, आणि संवेदनशीलतेच्या जोरावर मी स्वतःला पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी सिद्ध केलं. नंतर त्याच गुरुची शाबासकी ची थाप मिळाली जी की आयुष्याची शिदोरी बनली. दख्खन च्या पक्षीजीवनाचा अभ्यास करताना मला जाणवलं की ग्रेट इंडियन बस्टर्ड (GIB) हा पक्षी आता ९०% भागातून नामशेष झाला आहे. श्री बी. एस. कुलकर्णी सरानि सोलापुरातील नान्नज आणि करमाळा भागात माळढोक ची नोंद केली. त्यानंतर १९८०-२००० पर्यन्त BNHS च्या संस्थेमार्फत सखोल अभ्यास करण्यात आला. माळढोक अभयारण्याला २००४ मध्ये महत्वाचे पक्षी क्षेत्र IBA म्हणून घोषित करण्यात आले. पण काही कारणास्तव २००५ नंतर दीर्घकालीन अभ्यास झाला नाही. २००५ मध्ये माळढोक पक्ष्यांची भारतात संख्या ३५०–४०० होती, तर २०१३ मध्ये ती २००–२५० पर्यंत घसरली. आणि २०१० मध्ये नान्नज मार्डी क्षेत्रात २५ ची असणारी संख्या २०१७ मध्ये फक्त एक मादी पर्यन्त उरली. दख्खन चा दक्षिण-पश्चिम भाग—पश्चिम घाटाच्या कुशीत आणि सातपुडा पर्वतरांगांच्या सावलीत—अर्धशुष्क जैवप्रदेश, उघडी झुडपे आणि काटेरी जंगलांनी भरलेला. असा हा सगळा विस्तीर्ण गावताळ प्रदेश एकेकाळी पक्ष्यांनी गजबजलेला होता पण आता मागील दोन दशकात झपाट्याने झालेल्या विकासामुळे त्याचे तुकडे तुकडे झाला आहेत. जेथे माळढोकच्या पावलांचे ठसे दिसायचे, तेथे आता औद्योगिक बोर्ड लागलेले दिसतात. जेथे चंडोल (लार्क्सच्या) गाण्यांनी सकाळ सुरू व्हायची, तेथे आता ट्रकचे हॉर्न ऐकू येतात.

कधी काळी भरभरून गवत असलेली कुरणे—आता फक्त आठवणीतच उरतील असं वाटत आहे.

मी नान्नज अभयारण्य आणि सभोवतालच्या डेक्कन पठारावर २८२ पक्षीप्रजातींची नोंद केली. त्यात १४ संकटग्रस्त आणि ८ निकट संकटग्रस्त प्रजाती होत्या. माळढोकवर विशेष भर दिला. पण माळढोकचं अस्तित्व केवळ आकडेवारीत उरलं होतं. त्यांच्या अनुपस्थितीनेच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत होती. माळढोक व्यतिरिक्त मी चंडोल, भारतीय धाविक म्हणजे  इंडियन कोरसर, आणि चेस्टनट-बेलीड सॅंडग्रोस म्हणजेच ‘पखुरडी’ सारख्या प्रजातींचा ही अभ्यास केला. ऋतूनुसार पक्षी वैविध्यतेतील बदल, प्रति तास आढळण्याचा दर, आणि थव्याचा आकार याची माहिती संकलित केली. नान्नज-मार्डी परिसरातील एक चौ.कि.मी. गवताळ क्षेत्र निवडून चंडोल म्हंजेच लार्क्सच्या प्रजननाचा अभ्यास केला. तसेच ३०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या १४ निवडक गवताळ अधिवासांवर औद्योगिक प्रकल्पांचे स्थान नकाशावर अधोरेखित केले (ज्याना अधिक माहिती हवी असेल त्यांनी हा पेपर पाहावं – https://www.bnhs.org/public/pdf_documents/Deccan-birds-Great-Indian-Bustard-Indian-Birds-Journal.pdf).

दख्खन च्या कुरणात बीएनएचएसचे एक अनुभवी सहकारी विठोबा हेगडे ह्यांच्या सोबतची एक आठवण.

माळढोका च्या हरवलेल्या पावलांमागे चालताना त्यांच्या अनुपस्थितीनेच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत होती आणि स्वस्थ बसू देत नव्हती . हळूहळू हा प्रवास BNHS च्या माध्यमातून महाराष्ट्रातून संपूर्ण भारत अस एक व्यापक स्वरूप घेत होता आणि २०१८ मध्ये राजस्थान मध्ये जिथे आजही माळढोक आणि तणमोर आपल अस्तित्व टिकवून आहेत तिथेच स्थायिक व्हायच ठरवल. पोखरण (राजस्थान) येथे ११०० हेक्टर आणि बीदर (कर्नाटक) येथे ४० हेक्टर गवताळ क्षेत्र पुनर्स्थापित केलं. पण आजही दख्खन मध्ये आपण माळढोक वाचवू शकलो नाही ही खंत मनाला सतत सलत राहते.

थार च्या वाळवंटात अजूनही काही अधिवास उरला असल्याने माळढोक च अस्तित्व टिकून आहे.
दख्खन च्या पठारावर उंच गवताची कुरणे आता फारच दुर्मिळ झाली आहेत.

गावताळ अधिवासात “काय करावे ह्यापेक्षा के करू नये” हे समजून घेणं म्हणजेच संवर्धनाची खरी सुरुवात
निसर्ग संवर्धन ही केवळ कृतींची मालिका नाही, तर ती एक विचारसरणी आहे. “काय करावं” यावर भर देताना अनेकदा आपण अति-उत्साही उपाय राबवतो—जसे की वृक्षारोपण, संरक्षक कुंपण, जलसाठे इ. पण प्रत्येक उपाय सर्व ठिकाणी योग्यच असेल असं नाही. म्हणूनच नेहमी “काय करू नये” हे ओळखणं अधिक महत्त्वाचं ठरतं. माळरान म्हणजे उघड्या, कोरड्या, गवताळ जमिनी—जिथे गवत, झुडपे आणि स्थानिक जैवविविधता नैसर्गिकरित्या विकसित होते. अशा ठिकाणी झाडं लावणं म्हणजे त्या पारिस्थितिक तंत्राला बाधा पोहोचवणं. हे bustard आणि florican सारख्या गवताळ पक्ष्यांसाठी घातक ठरू शकतं. वृक्षारोपण हे पर्यावरणासाठी चांगलं असलं तरी योग्य ठिकाणी, योग्य प्रजाती च आणि योग्य पद्धतीनेच करावं लागतं. संवर्धन हे केवळ वैज्ञानिक किंवा प्रशासकीय उपक्रम नसतो—तो लोकांचा लोकांसाठी उपक्रम असतो. स्थानिक लोक, शेतकरी, चरवाहे, महिला, तरुण—हेच त्या परिसराचे खरे संरक्षक असतात. त्यांचा सहभाग, अनुभव, आणि भावनिक नातं निसर्गाशी जोडलेलं असतं. त्यांच्या विना केलेला कोणताही आराखडा तात्पुरता आणि अपूर्ण ठरतो. म्हणूनच नेहमी मी साईट बेस्ड संवर्धन आराखडा बनवाताना काही स्थानिक निसर्ग मित्र जसे की कमलेश बिश्नोई, पोखरण; जैसलमर; नाथुलाल कुम्हार, शोकलिया, अजमेर; सेवाराम माली, खिचन, फलोदि; आनंद बाबू, हगरिबोम्मनहळ्ळी, विजय नगर अशा लोकांबरोबर चर्चा करण महत्वाच समजतो. माझं काम नेहमी स्थानिक युवक, गावकरी, आणि वन विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन एक सहभागी संवर्धन मॉडेल उभं करण्याचे प्रयत्न करतो आहे. ज्यात पक्षी संरक्षण धोरण बनवणे, अधिवास पुनर्स्थापना, स्थानिक लोकसहभाग, युवक सक्षमीकरण, आणि छोटे छोटे संवर्धन मॉडेल तयार करणं यावर केंद्रित आहे. 

दख्खन च्या पठारावर जेव्हा जाण होत तेव्हा दरवेळी माळरानावर काहीतरी बदललेलं दिसतं.

तरुण संशोधकांसाठी एक संदेश

तुम्ही कुठूनही येऊ शकता—छोट्या गावातून, शेतकऱ्याच्या घरातून, किंवा शहराच्या गजबजाटातून. पण जर तुम्हाला निसर्गाशी नातं जोडायचं असेल, तर त्या नात्याला अभ्यास, संवेदनशीलता, स्थानिक सहभाग आणि कृतीची जोड द्या. संवर्धन म्हणजे केवळ पक्ष्यांना वाचवणं नाही—तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्या अस्तित्वाच्या खुणाना जिवंत ठेवणं जेणेकरून आपण कधी अपयश आल म्हणून खचणार नाही आणि अधिक सजग, अधिक समावेशक, आणि अधिक परिणामकारक समग्र आराखडा बनवू शकू. महाराष्ट्रातील अपयश आणि काय करू नये ही शिकवण राजस्थान मध्ये कामाला आली. आपण काही करायचा प्रयत्न केला तर चुका होऊ शकतात, अपयश मिळू शकत. वाटचालीत अपयश अपरिहार्य आहे—पण हे अपयश म्हणजे शिकवण आहे. त्यातून आपण पुढच्या प्रवासात अनुभवाची शिदोरी हीच पुढच्या यशाची गुरुकिल्ली ठरते. म्हणून आपण प्रयत्न करीत राहायच.

सुजित नरवडे, BNHS

पंखांच्या आठवणी – हरवलेल्या गवताळ अधिवासाची कहाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top