चंबलची “मॅडम सर” परवीन शेख  -किशोर रिठे

चंबलचा  परिसर कोण्या एके काळी डाकू व दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध होता. अश्या भागात उन्हाळ्यातील मुंबईची एक उच्च शिक्षित महिला स्कीमर आणि नदी सुरय पक्ष्यांना वाचविण्याचे काम करते. तिच्या धाडसीपणामुळे तिला येथे मॅडम “सर” म्हणून ओळखले जाते.

भारतीय स्कीमर म्हणजे नद्यांना आपल्या अस्तित्वाने जिवंतपणा देणारा पक्षी! तो थव्याने राहतो. मासे पकडण्यासाठी लागणारी लाल जर्द रंगाची टोकदार मोठी चोच, काळी पाठ, पांढरी मान आणि डोक्यावर काळी टोपी यामुळे तो अधिकच सुंदर दिसतो. त्याच्या आवाजाने तर तो आपले लक्ष वेधून घेतो. एखाद्या नावे प्रमाणे शरीराचा आकार असणारा हा पक्षी अगदी पाण्याच्या पृष्ठ भागावर सुर मारून आपले भक्ष पकडतो. त्यामुळेच त्याला स्कीमर हे नाव मिळाले आहे. नदीमधील मासे, कीटक हे यांचे खाद्य आहे. 

भारत, बांगला देश पाकिस्तान व म्यानमार मध्ये ते आढळून येतात. सखल भागातून वाहणाऱ्या नद्यांच्या आश्रयाने तो प्रजनन करतो. नराने मादिला मासा भरवीला की मग मादी समागमासाठी तयार होते. साधारणत नदीपात्रातील पाण्याने वेढलेल्या रेतीचे उंचवटे हेरून तो रेती खोदून आपली घरटी बनवितो. मग त्या घरट्यांमध्ये तो उन्हाळ्यात ३ ते ५ अंडी घालतो.

Indian skimmer on nest. Image credit: Parveen Shaikh. The image was clicked for scientific research and does not promote nest photography.

नदीपात्रात घरटी करणाऱ्या पक्ष्यांचा नदीमध्ये असणारी रेतीची बेटे, खडक टापू कोठे आहेत व तेथील पाण्याची पातळी महिन्याकाठी कशी बदलते आणि त्या क्षेत्रांच्या सभोवती मानवी व इतर हस्तक्षेप किती प्रमाणात आहे याचा चांगला अभ्यास झालेला असतो. किंबहुना हे सगळे हेरूनच हे पक्षी नदी पत्रात अंडी घालतात.

परंतु नद्यांच्या पर्यावरणात आता आमूलाग्र बदल झालेला आहे. नद्यांवर झालेल्या धारणांच्या निर्मितीमुळे नदीतील पाण्याच्या पातळीत सातत्याने बदल होतात. त्यामुळे पक्ष्यांना घरटी करतांना धरण बांधणारे लोंक पुढे कसे वागतील याचा अंदाज येत नाही. धरणातून अचानक पाणी सोडण्याचा फटका जसा नदीकाठच्या गावांना बसतो तसा या पक्ष्यांना सर्व प्रथम बसतो. त्यात त्यांची घरटी व परिवार नेस्तनभूत होतात. हे फक्तच पावसाळ्यात होत नाही तर उन्हाळ्यात सुद्धा त्यांच्या नशिबी येते.  

Indian skimmers along the river bank. Image credit: Viraj Athalye

मानवी लोकसंख्या आणि गुरे यांची संख्या वाढल्याने उन्हाळ्यात या नद्यांवर पाण्यासाठी मनुष्य व गुरांचा वावर, हस्तक्षेप व दबाव वाढला आहे. त्यामुळे नदीपात्रात अंडी घालणाऱ्या सर्वच पक्ष्यांच्या घरट्यांवर, त्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम झाला आहे. तीच परिस्थिति भारतीय स्कीमर पक्ष्याची झाली आहे. त्यांची संख्या आता सर्व देशांमध्ये मिळून अंदाजे २५०० च्या आसपास राहिली आहे. 

BNHS researchers scanning the sand bank for Indian skimmer nests. Image credit: Amir Khan

मध्य प्रदेशातील चंबल विभागातील भिंड व मोरेना हे जिल्हे पूर्वी सुरक्षित नसल्याचे मानले जायचे. येथील चंबलचा  परिसर कोण्या एके काळी डाकू व दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध होता. अश्या भागात उन्हाळ्यातील मुंबईची एक उच्च शिक्षित महिला स्कीमर आणि नदी सुरय पक्ष्यांना वाचविण्यासाठी दिवस रात्र काम करते. तिचे नाव परवीन शेख! परवीनच्या धाडसीपणामुळे तिला येथे “मॅडम सर” म्हणून ओळखले जाते.  

बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी ही पक्ष्यांच्या अभ्यासासाठी ओळखली जाणारी संस्था आहे. परवीन या संस्थेत पक्षी शास्त्रज्ञ म्हणून काम करते.

A boat survey in the Chambal River for Indian skimmers. Image credit: Hari Mohan Meena

बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी तर्फे २०१७ मध्ये राष्ट्रीय चंबल अभयारण्यात सर्वेक्षण हाती घेण्यात आले. यावेळी पहिल्यांदा घरट्यांची संख्या चांगली असूनही फारच कमी घरट्यांमधून पक्ष्यांची पुढची पिढी सुखरूप बाहेर पडते हे लक्षात आले. त्यामुळे संस्थेतर्फे एक विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला. त्याची जबाबदारी डॉ. परवीन शेख यांच्यावर देण्यात आली. परवीन वर आपल्या अभ्यासा सोबतच या पक्ष्यांच्या घरट्यांना वाचविण्याचे एक महत्वपूर्ण काम करायचे होते.

त्यासाठी तिने “नेस्ट गार्डियन कार्यक्रम” म्हणजेच घरटे वाचविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी स्थानिक गावकऱ्यांना सोबत घेतले. त्यांचा विश्वास संपादन केला. चंबल सारख्या भागात एका धडपडणाऱ्या मुलीला पाहून गावकरी पुढे आले. त्यांनी आपल्या मुलीसारखे तिला प्रेम दिले. परवीनने काही गावकऱ्यांची उन्हाळ्यात नदीपात्रात राखणदार म्हणून नेमणूक केली.

तिला आता गावकरी “मॅडम सर” अशी हाक मारू लागले. “मॅडम सर” ने सांगितल्या नुसार स्कीमरची अंडी असणाऱ्या रेती बेटांना काटेरी कुंपण घालून स्थानिकांच्या मदतीने बंदिस्त केल्या गेले. त्यामुळे गुरांच्या पायदळी तुंडविल्या जाणारी घरटी आता सुरक्षित झाली. गावठी कुत्रे यातील अनेक घरट्यांमधील अंडी खायचे, आता त्यासही आळा बसला. पुढे  अंडी उबवून पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले. २०२० ते २०२२ या काळात तर पक्ष्याची संख्या आणि घरटी यांची संख्या तर वाढलीच, तसेच प्रत्येक घरटया मधून यशस्वी रित्या पिल्ले बाहेर येण्याचे प्रमाणही वाढले.

Indian skimmers on a sandbank. Image credit: Hari Mohan Meena

आता या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी डॉ. परवीन ने  “हेल्पिंग स्कीमर स्कीम” नावाचा कार्यक्रम सुरू करून यासाठी निधी उभारण्याचे ठरविले आहे. यातून राष्ट्रीय चंबल अभयरण्यामधील जास्त जागा संरक्षित करण्याचा तिचा मानस आहे.  

परवीन ने येथे अनेक पक्ष्यांच्या पायांमध्ये कडी घातली. त्यापैकी काही पक्षी गुजरात, ओरिसा, बंगला देश येथील समुद्र किनाऱ्यावर व किनाऱ्या नजीक असणाऱ्या तलाव, सरोवरांवर आढळून आले. यातून प्रजनन काळ व इतर वेळी स्कीमर कोठे जातात ही माहितीही हाती आली. प्रजनन काळ सोडला तर स्कीमर समुद्र किनारी सुद्धा राहतो. हिवाळ्यामध्ये हे पक्षी गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि नजीकच्या बंगलादेश मध्ये वास्तव्य करतात असे आढळून आले आहे.   

ही यशोगाथा खरे म्हणजे मी सांगितली तेवढी साधी मुळीच नाही. तिने संगीतलेला एक किस्सा ऐकला की त्याची जाणीव होईल. २०२२ चा उन्हाळा होता. परवीन रात्री उशिरा पर्यन्त नदी पात्रात होती. मध्य रात्री तिला “स्कीमर गार्ड” म्हणजेच रखवालदाराचा फोन आला. मध्यरात्री पक्ष्यांचे अचानक किंचाळणे सुरू आहे. गार्डाच्या चौकीत अचानक  पाणी शिरले. घरटी  असणाऱ्या रेतीची  बेटे बहुदा पाण्याने वेढली आणि त्यातील काही बेटे पाण्याखाली गेली असण्याची शक्यता होती.

परवीन धावतच नदीजवळ पोहोचली. तिला तिच्या पक्ष्यांचा आक्रोश पाहवेना. तिने मध्य रात्रीच बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकांना फोन केला. त्यांनी स्थानिक आमदार यांना फोन केला. सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. प्रवीण परदेशी यांनी राजस्थानच्या मुख्य सचिवांना फोन केला. त्यांनी सिंचन विभागाला फोन केला तेव्हा कळले की सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाचे दरवाजे अचानक उघडल्याने पाण्याची पातळी अचानक वाढली होती. या सर्व प्रयत्नांनी दरवाजे पुन्हा बंद झाले.

पण जे नुकसान व्हायचे ते होवून गेले होते. दुसऱ्या दिवशी दिवस उजाडल्या नंतरचे चित्र खूप विदारक होते. अनेक घरटी वाहून गेली होती. नदी पात्राच्या कडेला काही अंडी आणि पिल्ले मरून पडली होती. परवीनच्या अर्ध्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. आता तिने चंबल नदीवरील धरणाचे  पाणी नियंत्रित करणाऱ्या प्रणालीमध्ये पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाचा विचार व्हावा यासाठी धोरणात्मक बदल आणण्याचा निश्चय केला. तिचे ते कामही सध्या सुरू आहे. 

Chicks drowning due to sudden water release from dam. Image credit: Viraj Athalye

या सर्व कामात तिला बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी सोबतच मध्य प्रदेश वनविभाग व वन्यजीव विभागाचे सहकार्य मिळत आहे. देणगीदारांची साथ मिळाली तर लवकरच तिचे छोटेसे स्वप्न आता मोठे होणार आहे. चंबलच्या लोकांची “मॅडम सर” परवीन आता या अनाथ पक्ष्यांची पालक झाली आहे. तिच्या धाडसी कामापासून अनेक महिलांना प्रेरणा मिळणार आहे. यातून भारतातील पक्ष्यांचे संरक्षण अधिक मजबूत होणार आहे. (मदतीसाठी संपर्क- बी. एन. एच. एस-०२२-२२८२१८११)

लेखक किशोर रिठे बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी चे संचालक आहेत. मागील 35 वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात ते कार्यरत असून त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहे. तसेच केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैव विविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे. 

Feature Image : Researcher Parveen Shaikh with an Indian skimmer.
Image credit: Aristo Mendis

चंबलची “मॅडम सर” परवीन शेख  -किशोर रिठे

One thought on “चंबलची “मॅडम सर” परवीन शेख  -किशोर रिठे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top