अनेक वर्षांपूर्वी डॉ. सालीम अलिंचे नाव ऐकले होते तेव्हा हे सुद्धा कळले की ते मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी. एन. एच. एस.) ह्या नामांकित संस्थेत पक्षीशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते. ह्या संस्थेबद्दलचे कुतूहल तेव्हापासूनच लागून होते. नंतर इथेच नोकरी लागली आणि बी. एन. एच. एस. ला जाणून घेण्याची संधी मिळाली.
स्वातंत्र्य पूर्व भारतात इंग्रजांचे राज्य होते. ह्या इंग्रजांना प्रत्येक गोष्टीचे कुतूहल तर होतेच पण प्रत्येक गोष्टीच्या पद्धतशीर वैज्ञानिक नोंदी घेऊन त्या प्रकाशित करण्याची त्यांची प्रवृत्ती होती (पोर्तुगीज हयाविरुद्ध होते). भारतात आपापल्या नोकऱ्या, विशेष करून सैन्यामधील, सांभाळून फावल्या वेळात ते शिकार करीत तसेच निसर्ग इतिहासाच्या नोंदी घेत. विविध प्राण्यांचे, वनस्पतींचे नमुने गोळा करत आणि त्याचे जातं करीत.
अशाच वैज्ञानिक दृष्टी असलेल्या सहा इंग्रज अधिकाऱ्यांनी आणि दोन भारतीय नागरिकांनी मिळून १५ सप्टेंबर १८८३ रोजी आम्ही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी स्थापन करीत असल्याचे घोषित केले. त्यांची ही सभा मुंबई मधील आजच्या भाऊ दाजी लाड वस्तु संग्रहालयात (पूर्वीचे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूजियम) झाली होती. त्यात काही नामांकित व्यक्ति होत्या जसे डॉ. सी. एच. एटकेन, कर्नल स्विनहो (फुलपाखरांचे तज्ञ), श्री जे. सी. अँडर्सन ईत्यादी. डॉ. आत्माराम पांडुरंग आणि डॉ. सखाराम अर्जुन ही दोन मराठी माणसे त्यात होती. तीन वर्षानंतर त्यांनी निसर्ग इतिहासाच्या नोंदी प्रकाशित करण्यासाठी विज्ञान पत्रिका (जर्नल) सुरू केली.
केवळ भारतीय उपखंडच नव्हे तर अगदी आग्नेय आशिया खंडातील निसर्ग तज्ञ त्यांनी जमविलेले प्राण्यांचे नमुने इथे पाठवायला लागले. त्या प्राण्यांची वर्णने, माहिती संस्थेच्या विज्ञान पत्रिकेत छापल्या जाऊ लागली. एखाद्या क्लब प्रमाणे सुरुवात झालेली ही संस्था हळूहळू नावारूपास आली. हळूहळू इथे प्राणी पक्षी कीटक फुलपाखरांचे हजारो नमुने गोळा झाले. त्यामुळे मग नवीन नमुन्यांचे वर्णन करण्यासाठी आणखी शास्त्रज्ञ इथे येऊ लागले. संपूर्ण दक्षिण आणि आग्नेय आशिया खंडातील जैवविविधता आणि निसर्ग इतिहासाच्या दृष्टीने संथ नावारूपास आली.
आता संस्थेला १४० वर्षांचा इतिहास आहे. संस्थेमध्ये कितीतरी नामांकित शास्त्रज्ञानी काम केले आहे, योगदान दिले आहे. किंबहुना इथे आल्यानंतर अनेक शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध झाले.
१९१२ मध्ये आर. सी. राऊटन नावाच्या शास्त्रज्ञाने संपूर्ण भारतीय उपखंडात एक तप चाललेले सस्तन प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केले तसेच ५० हजार नमुने गोळा केले. त्यानंतर डॉ. सालीम अली सारख्या शास्त्रज्ञांनी ह्या संस्थेमध्ये संपूर्ण आयुष्य भर कार्य केले. त्यांनी भारतीय उपखंडातील पक्ष्यांबद्दल संशोधन, लिखाण तसेच त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती केली. त्यांनी पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाचे तंत्र भारतात आणले आणि स्वतः हजारो पक्ष्यांच्या पायात कडी घालून भारतात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांबद्दल माहिती शोधून काढली. त्यांनी लिहिलेली पुस्तके, विशेष करून उपखंडातील पक्ष्याबद्दलचे दहा खंड, आजही मापक म्हणून मानली जातात.
बिगेडिअर विलियम इवांस ह्यांनी लिहिलेले फुलापाखरांचे ओळख करण्यासाठीचे पुस्तक (१९३२) आणि श्री विंटर ब्लिथ ह्यांनी काढलेली पहिली फुलपाखरांची ‘फील्ड गाईड’ (१९५३) आजही उपयोगी पडते. त्यानंतर किमान ५० वर्षे तरी ह्या विषयावर अधिक चांगले पुस्तक येऊ शकले नाही.
संस्थेसोबत काम केलेल्या काही थोर व्यक्तींमध्ये फ्रँक वॉल, डब्ल्यू एस. मिलार्ड, चार्ल्स मॅककान, डॉ. एस. एच. प्रॅटर, एस. डिलॉन रिप्ले, ई. पी. गी, लोके वान थो, आर. ए. स्टर्नडेल, डॉ. सालीम अली, हुमायूँ अब्दुलअली, बी. जी. देशमुख, जफर फतेहअली इत्यादि नावे घेता येतील.
संस्थेने जगाला अनेक नामांकित वन्य जीव शास्त्रज्ञ, अभ्यासक दिले. त्यात कितीतरी नावे घेता येतील. अलीकडच्या काळात डॉ. जे. सी. डॅनियल (वन्य सस्तन प्राणी), डॉ. बोमन छापघर, डॉ. दिपक आपटे (समुद्री जीव), डॉ. असद रहमानी, डॉ. रणजीत मनकदन (पक्षी), डॉ. बालाचंद्रण (पक्षी स्थलांतर), डॉ. आयझॅक केहीमकर (फुलपाखरे, वनस्पती), डॉ. वरद गिरी (सरीसृप) ही काही ठळक नावे घेता येतील.
आज जरी संस्थेचे कार्यालय फोर्ट येथील छत्रपती वास्तु संग्रहालयाच्या वस्तूला लागून असले तरी आधी हे कार्यालय फिपसन् अँड कंपनीच्या इमारतीत, अपोलो स्ट्रीट इथे होते. सध्याच्या कार्यालयाला ‘हॉर्नबिल हाऊस’ असे नामाभिधान देण्यात आले आहे. त्यामागे छान गोष्ट आहे. अपोलो स्ट्रीट येथील कार्यालयात २६ वर्षेपर्यंत रहिवासी असलेल्या महाधणेश (ग्रेट हॉर्नबिल) पक्ष्याचा मुक्काम होता. हा पक्षी कारवार येथून संस्थेला भेट स्वरूपात मिळाला होता. १९२० पर्यन्त जगलेल्या ह्या धनेशाचे नाव विल्यम असे होते. तो संस्था सचिव तसेच इतर सर्वांचा लाडका होता. त्याची आठवण म्हणून कार्यालय तसेच संस्थेचे त्रैमासिक ह्यांचे नाव ‘हॉर्नबिल’ असे ठेवण्यात आले.
आता १४० वर्षे पूर्ण झालेल्या बी. एन. एच. एस.चे कार्य अजूनही जोरात सुरू असून संस्थेने वन्य जीवसंशोधन व संवर्धन तसेच पर्यावरण शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक मोठी कार्ये पार पाडली आहेत. भारतातील वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ तयार करण्यात संस्थेचे मोठे योगदान होते. त्यानंतर कितीतरी पर्यावरण विषयक कार्यात बी. एन. एच. एस. नेहमी अग्रेसरच राहिली आहे.
विशेष म्हणजे आज असलेली संस्था संस्थेच्या सदस्यांमर्फत निवडल्या गेलेल्या प्रतीनिधिंद्वारा चालविल्या जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्था बर्डलाईफ इंटरनॅशनल सारख्या अनेक नामांकित संस्थासोबत जुळलेली आहे. टाटा तसेच गोदरेज सारख्या अनेक नामांकित कंपन्यांनी संस्थेला नेहेमी सढळ हाताने मदत केली.
संस्थेने पर्यावरण शिक्षण क्षेत्रात सुद्धा झेप घेऊन मुंबई, दिल्ली तसेच नागपूर येथे केंद्रे प्रस्थापित केली. त्याद्वारा लाखों नागरिक तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण दिले जाते. पर्यावरणाच्या बद्दल सजग आणि जबाबदार असलेली पिढी घडविण्याचे महान कार्य ह्या ठिकाणी केल्या जाते. हयाद्वारे शिकलेले अनेक तरुण आज संस्थेत कार्य करीत आहेत.
संस्थेने प्रकाशित केलेली कितीतरी पुस्तके अभ्यासक्रमात तसेच संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडत आहेत. हौशी निसर्ग प्रेमींसाठी तर संस्थेची पुस्तके म्हणजे जंगला बद्दलच्या ज्ञानाचा जणू खंजिनाच आहे. त्यात मग पक्षी, फुलपाखरे, सरीसृप (सांप, पाली, सरडे), वन्य सस्तन प्राणी, तसेच जंगला बद्दलची ललित पुस्तके ह्यांचा उल्लेख करतं येईल.
संस्थेच्या कार्यालयात भारतीय उपखंड आणि शेजारील देशांमधून मिळविलेले वन्यजिवांचे नमुने संग्रहित करून ठेवले आहेत. त्यामध्ये ५०००० कीटक (फुलपाखरांसंहित), ३०००० पक्षी, २०००० सस्तन प्राणी तसेच २०००० सरीसृप प्राण्यांचा समावेश आहे. तसेच संस्थेच्या कार्यालयात मोठा पुस्तक संग्रह व वाचनालय असून त्यामध्ये वन्यजीवन, वनस्पती, तसेच पर्यावरणासंबंधीची हजारो पुस्तके आहेत. अनेक दुर्मिळ व जून ग्रंथ इथे संग्रही असून त्यांचे जातं केल्या जाते. हे आपल्या देशातील निसर्ग इतिहासावरील पुस्तकांचे सर्वात जूने व मोठे वाचनालय म्हटल्यास वावगे ठरू नये.
आज भारतात नष्टप्राय झालेल्या अनेक प्रजातींना वाचविण्यासाठी बी. एन. एच. एस.चे शास्त्रज्ञ झटत आहेत. अगदी नष्टप्राय झालेल्या माळढोक पक्ष्यांना वाचविण्यासाठी संस्थेचे शास्त्रज्ञ संपूर्ण भारतात कार्यरत आहेत. अगदी नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांना वाचविण्यासाठी संस्थेने पुष्यकार घेऊन त्यांचे कृत्रिम प्रजनन घडवून आणण्यात यश मिळविले. आज अशी अनेक गिधाडे आकाशात मुक्त विहार करण्यासाठी सोडण्यात येत आहेत.
संस्था आज भारतातील अनेक राज्यांमध्ये कार्यरत असून विविध वन्य जीवांवर संशोधन प्रकल्प राबवित आहे किंवा संवर्धनासाठी प्रयत्नरत आहे. त्यात गावताळ माळराने असोत, गिधाडे असोत, समुद्री जीवसंपदा असो की हिमालयातील वणीजीव असो. संस्था शेकडो लोकांच्या सहभागाने आणि कित्येक शास्त्रज्ञांच्या म्हणतीने सहभागाने उभी राहते, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच १४० वर्षानंतरही संस्था अजूनही तरुण आहे. निसर्ग इतिहासाचा वारसा जतन करणारी ही संस्था सुद्धा ऐतिहासिक झाली आहे.
डॉ. राजू कसंबे बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी येथे सहायक संचालक आहेत. त्यांना पक्षी, फुलपाखरे, तसेच पर्यावरण शिक्षण ह्या विषयात रुचि आहे.