जंगलातल्या मैत्रीची गोष्ट

भल्या पहाटेच बंटी आणि चिकू जंगलात आले होते. निमित्तही तसेच होते. मुंबईचे प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सालीम अली त्यांच्या गावाला आले होते. सालीम अंकल (खरे तर आजोबा) त्यांच्या बाबांच्या परिचयातले होते. त्यामुळे सकाळी फिरायला त्यांनी ह्या दोन चुणचुणीत मुलांना सोबत न्यायचे कबुल केले होते. मुलांना थोडी भीती वाटत होती. कारण ते खूप म्हणजे खूपच मोठे शास्त्रज्ञ आहेत असे त्यांना पुन्हा पुन्हा बजावले गेले होते. 

त्यांच्या घरी डॉ. सालीम अलींनी लिहिलेले ‘बूक ऑफ इंडियन बर्ड्स’ हे सुंदर पुस्तक होते. बंटी आणि चिकू त्यातील चित्रे बघून पक्ष्यांची ओळख करायचे. त्यांचे बाबापण त्यांना पक्षीनिरीक्षणाला घेऊन जात. त्यामुळे त्यांना परसबागेतील तसेच सर्वसामान्य पक्ष्यांचा बर्‍यापैकी परिचय होता. 

सालीम अंकल मुलांना प्रश्न विचारायला लागले तेव्हा मुलं सुरूवातीला गांगरून गेली. पण बाबा सोबत असल्यामुळे त्यांनी हिम्मत ठेऊन उत्तरे दिली. विशेष म्हणजे त्यांनी मुलांना फुलांचे परागणन कसे होते ते विचारले. मुलांना पक्षी कशा प्रकारे पर-परागणन घडवुन आणतात ते चांगलेच माहिती होते. त्यांनी आत्मविश्वासाने दिलेली उत्तरे एकूण सालीम अंकल खुश झाले. 

जवळच शाल्मलीचा डेरेदार वृक्ष फुलला होता. मधुरस चाखायला पक्ष्यांची नुसती झुंबड उडाली होती. त्यात शिंजिर, साळुंकी, भांगपाडी मैना, पिवळ्या गळ्याची चिमणी, दयाळ, स्थलांतरित भोरडी पक्ष्यांचे थवे, हळद्या, एवढेच नव्हे तर कावळे आणि सुतार पक्षी सुद्धा होते. 

झाडं पक्ष्यांना मधुरस देऊन त्याच्या बदल्यात त्यांच्या कडून परागकण वाहून घेतात. त्यामुळे झाडांचा तसेच पक्ष्यांचा दोहोंचाही फायदा होतो. निसर्गात अशी देवाण घेवाण अविरत चालू असते. 

Honey bees feed on Image credit: Raju_Kasambe

मुलांच्या घरी फायरक्रकरचे रोपटे कुंडीत लावलेले होते. त्याची फुले छान छोट्या मिरची फटाक्यासारखी लालचुटूक असतात. त्यांचे एक काका अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांनी हे रोपटे त्यांच्यासाठी आणले होते. सुदैवाने जे जगले सुद्धा. ते म्हणाले होते की अमेरिकेत गुंजनपक्षी (हमींगबर्ड) नावाचे पिटूकले पक्षी ह्या फुलांवर भिरभिरतात आणि उडता उडता त्यातील मधुरस चोखून घेतात. ह्या रोपट्याला फुलं लागल्यावर मुलांच्या घरा-परसात शिंजिर पक्ष्याची ये-जा वाढली. त्या नळीसारख्या इवल्याशा फुलात इवलीशी वक्राकार चोच घालून त्यातील मधुरस ते चोखू लागले. सुरूवातीला बंटी आणि चिकू सनबर्डला हमींगबर्ड म्हणत असत. नंतर त्यांना कळले की हमींगबर्ड केवळ अमेरिकेत आढळतात.   

सालीम अंकलना मुलांनी त्यांचा अनुभव सांगितला तेव्हा ते खुश झाले आणि सांगायला लागले. 

“झाडांना चालता फिरता येत नाही. त्यांची मुळे जमिनीत घट्ट रोवलेली असतात. पण त्यांना त्यांचे काम करवून घ्यायचे असते. त्यासाठी हजारो वर्षांपूर्वी जेव्हा झाडांना ही समस्या भेडसावली तेव्हा त्यांना हे उमगले के आपली कामे आपण इतर प्राण्यांकडून करवून घेऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला त्यांच्यासोबत मैत्री करणे जरूरी आहे. त्यांच्याशी संवाद साधने जरूरीचे आहे. 

काही झाडांनी असे ठरविले की माझी कामे मी कीटकांकडून करवून घेईल. काहींनी ठरविले की माझी कामे मी पक्ष्यांकडून करवून घेईल. इतरांनी इतर मोठ्या प्राण्यांची सुद्धा मदत घ्यायचे ठरविले. काहींनी तर कीटकांमध्ये सुद्धा नेमका माझा कीटक कुठला ते सुद्धा ठरवून टाकले. अनेकांनी तर कीटकांपैकी केवळ फुलपाखरांची निवड केली तर काहींनी निशाचर पतंगांची, भुंग्यांची निवड केली. अशा प्रकारे झाडांनी आपापले काम करण्यासाठी मित्र निवडले. 

मग त्यांनी स्वतःमध्ये बादल घडवून आणले. त्यासाठी त्यांना हजारो वर्षे वाट बघावी लागली. प्रत्येक झाडाचे वनस्पतीचे फूल त्यांच्या निवडीप्रमाणे ‘डिझाईन’ व उत्क्रांत झाले. इकडे पक्ष्यांना झाडांनी ‘ऑफर’ केलेले काम व त्याचा मोबदला फायदेशीर वाटला. त्यांनी सुद्धा स्वतःमध्ये बदल घडवून आणले. अनेक पिढ्यांनंतर त्यांच्या चोचिंमध्ये बदल घडून आले. 

जेव्हा झाडांना परागकण दूरपर्यंत पाठवायचे असतात तेव्हा झाडे आपली खूप सारी ऊर्जा रंगीत फुलांची निर्मिती करण्यात खर्च करतात. झाडांचा बहर म्हणजे फुलांचा रंग बघून पक्ष्यांना संदेश मिळतो. मधुरस लुटण्यासाठीचे ते आमंत्रण समजून झाडावर पक्ष्यांच्या झुंडी उतरतात. लाल नारिंगी रंगाची भडक फुलं म्हणजे पक्ष्यांना दिलेलं त्यांच्या भाषेतील आमंत्रण असतं. शाल्मलीची फुलं आईसक्रीमच्या पेल्यासारखी असतात. त्यात भरपूर मधुरस भरलेला असतो. त्यामुळे भोरड्या सारखे दूरपर्यंत स्थलांतर करणारे पक्षी त्यावर गर्दी करतात. पळस आणि पांगर्‍याचीही फुलं अशीच पक्ष्यांना आकर्षित करतात आणि मधुरसच्या बदल्यात आपले काम करवून घेतात”.

परत येताना मुलांना कौशिचे झाड दिसले. झाडाखाली काही फुलं पडली होती. चिकूने सालीम अंकलना सांगितले की ह्या झाडाच्या फुलांवर सुद्धा बरेच पक्षी येतात. सालीम अंकलणी जमिनीवर पडलेले एक फूल अलगद उचलले. पक्ष्यांचे पुस्तक मुलांना उघडायला सांगितले. म्हणाले 

“सनबर्ड दाखवा बघू”. 

त्यांनी हळुवारपणे ते इवले फूल उलटे धरले. म्हणाले
“बघा, आकार सनबर्डच्या चोचीसारखा दिसतो का?” खरेच होते ते. कौशीच्या फुलाची चोच अगदी सनबर्डच्या चोचीसारखीच दिसत होती. म्हणजे सनबर्डनी चोच फुलात घातली तर ती एकदम फिट बसेल आणि बुडाशी असलेला मधुरस त्याला मिळेल.
“तुमच्या काकांनी अमेरिकेहून आणलेल्या फायरक्रकरचे फूल सुद्धा असेच. जणूकाही हमिंगबर्डची चोचच”.   

“मग पक्षी सोडून इतर प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी झाडं काय करतात?” बंटीनी नेमके मुद्द्यावर बोट ठेवले. 

सालीम अंकल सांगू लागले. 

Sunbird robbing Ipomea flowers of nectar. Image credit: Uday Agashe

जसं अनेक झाडांनी पक्ष्यांसाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणले आणि पक्ष्यांसोबत मैत्री केली. त्यांनी लाल, नारिंगी, जांभळी फुलं निर्माण केली. तसंच इतर झाडांनी सुद्धा केलं. ज्यांना कीटकांशी, जसं भुंगे, फुलपाखरे, पतंग, मैत्री करायची होती अशा झाडांच्या फुलांना भडक रंगाच्या पाकळ्या निर्माण झाल्या. स्वतःची फुलं एकेकटी किंवा गुच्छामध्ये ठेवली.  

ज्यांना फुलपाखरांशी मैत्री करायची होती त्यांनी स्वतःची फुलं व पाकळ्या रंगीत केली तसेच गुच्छामध्ये ठेवली. जसं सूर्यफूल, पेंटास, ईक्झोरा, रानझेंडू, घाणेरी, जास्वंद. जांभळा, निळा, लाल, पिवळा, रंग पाकळ्यांना दिला. पण ज्या फुलांना रात्रीचर कीटकांशी मैत्री करायची होती त्यांनी फुलांना पांढरा रंग दिला आणि फुलांमध्ये विविध प्रकारचे गंध निर्माण केले. अर्थात त्यातील काहींना तुम्ही दुर्गंध सुद्धा म्हणू शकता. कारण ते गंध मुळात तुमच्यासाठी नाहीतच. ते आहेत रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडणार्‍या पतंग किंवा भुंग्यांसाठी. अशा फुलांनी आपल्या पाकळ्यांची लांबी सुद्धा खूप वाढवून त्या पुंगळीसारख्या करवून घेतल्या. म्हणजे कुठल्याही पक्ष्याची चोच मधुरसापर्यंत पोचणार नाही. पण पतंगाची सोंड मात्र तिथे सहजी पोचेल. सदाफुली, जाई-जुई अशी कितीतरी सुगंधी पांढरी फुलं आहेत. 

काही फुलांमध्ये तर दिवसा उडणार्‍या कीटकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लॅंडींग’ची जागा आणि मधुरसापर्यन्त पोचण्यासाठी धावपट्टी सुद्धा असते. ही विशेष भडक रंगांनी दाखविलेली असते.  

रस्त्यात एक टिकोमाचे झाड होते. त्याला पिवळ्या फुलांचे छान हळदिसारखे गुच्छं लागले होते. 

अंकल विचारते झाले 

“सांगा बघूया ह्या झाडांची कुणाशी मैत्री असेल?”

“सर, फुलं पिवळी आहेत आणि पाकळ्यांची नळी खूप लांब आहे म्हणजे नक्कीच किटकच!”
“बरोबर! चला तर तपासून बघूया!” 

आणि खरंच त्या फुलांमध्ये भरपूर मुंग्या होत्या. सालीम अंकल झाडाजवळ गेले, एक फुलांची फांदी त्यांनी हाताने झुकवली आणि अलगद दोन फुलं तोडली. 

त्या फुलांच्या बुडाशी छोटी छिद्र दिसत होती. 

“हे कुणाचे काम?” मुलं नुसती बघत राहिली. 

“अरे जरी ह्या झाडाने ठरविले की मी माझा मधुरस केवळ कीटकांना देणार आहे. तरी सुद्धा निसर्गातील इतर मधुरस प्रेम्यांना मधुरसाचा सुगावा लागलाच; पण फुलाची लांबी अधिक असल्याने त्यांची चोच काही पुरेना. मग त्यांनी फुलाच्या बुडाशी धारदार आणि अनुकूचिदार चोचिने छिद्र केले आणि मधुरसावर ताव मारला. परागवहनाचे काम न करता!”      

“सर ही तर सरळ सरळ चोरी झाली” चिकू उद्गारला. 

“हो. बरोबर. ह्याला चोरीच म्हणतात. नेक्टर रॉबरी!! म्हणजे सनबर्ड चोरी करतो. आणि अमेरिकेतील जंगलातला सर्वात इवला चोर म्हणजे हमिंगबर्ड!!”

झाडांनी निवड केल्याप्रमाणे फुलांमध्ये परागकण अशाप्रकारे ठेवलेले असतात की मधुरस प्राशन करायला आलेल्या प्राण्याच्या अंगावर परागकण आपसूक चिकटतील”.

सालीम अंकलनी मुलांना एक प्रश्न केला “ह्याचा अर्थ काय?”

बंटी म्हणाला “ह्याचा अर्थ झाडांची आणि फुलांची पुरातन मैत्री आहे”.
चिकू म्हणाला “हो. आणि त्यांना एकमेकांची भाषा कळते. पण ती भाषा मानवासारखी शब्दांची, आवाजांची नसून रंग, आकार, गंध, देवाणघेवाण ह्याची असते.”  

“अंकल मग ह्याला आपण काय म्हणू शकतो?” इति बंटी. 

“मुलांनो, जसं तुम्ही पक्षी-प्रेमी आहात तशी झाडंसुद्धा पक्षी-प्रेमी, कीटक-प्रेमी, प्राणी-प्रेमी असतात. निसर्गात सुद्धा भुरटे चोर असतात. हयानंतर तुम्ही पक्षी बघायला जाल तेव्हा ह्या मैत्रीच्या संबंधाच्या नोंदी निश्चित घ्या, आणि चोरांवर सुद्धा लक्ष ठेवा. म्हणजे तुम्हाला जंगलातील मैत्रीचे जिव्हाळ्याचे संबंध कळायला लागतील आणि सर्व सजीव एकमेकांचे कसे सखे सोयरे आहेत ते सुद्धा कळेल”.   

(पूर्वप्रसिद्धी: तरुण भारत)

जंगलातल्या मैत्रीची गोष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top