आपल्याला नेहेमी लागून असलेले कुतूहल म्हणजे महाराष्ट्रात स्थलांतर करून येणारे पक्षी नेमके कुठून स्थलांतर करून येतात किंवा इथून ते कुठे स्थलांतर करून जातात? ह्या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात जरी देता आले नाही तरी आपण असे म्हणू शकतो की विविध पक्षी प्रजातींचा स्थलांतर मार्ग आणि येण्याची जागा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे सगळे स्थलांतरित पक्षी “सायबेरिया” वरून येतात असे म्हणणे योग्य ठरणार नाही. जसजसे ह्या क्षेत्रात संशोधन होत आहे त्याप्रमाणे हळूहळू आपल्याला पक्षी स्थलांतराची माहिती उपलब्ध होत आहे.
भारतात पक्षी स्थलांतराचा अभ्यास करणारी अग्रगण्य संस्था म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई (बीएनएचएस) ही होय. माझ्या सुदैवाने मी सुद्धा गेल्या अकरा वर्षांपासून बीएनएचएस मध्येच काम करतोय. बीएनएचएस द्वारा २०१८ साली प्रकाशित केल्या गेलेल्या “इंडियन बर्ड मायग्रेशन अॅटलस” (लेखक: डॉ. एस. बालाचंद्रण, तूहिना कट्टी व डॉ. रणजीत मनकदन) ह्या उत्कृष्ट शास्त्रीय ग्रंथात भारतातील पक्षी स्थलांतराची उपलब्ध असलेली अद्ययावत माहिती संकलित करून सादर केलेली आहे. सोबत त्यांचे सरळ रेषेतील स्थलांतर मार्ग दाखविणारा नकाशा सुद्धा दिलेला आहे.
पण अशीच माहिती केवळ महाराष्ट्र राज्यापूरती मला मिळाली नाही. बीएनएचएस द्वारा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्ष्यांच्या पायात वाळे (रिंग) लावून अभ्यास केल्याची माहिती उपलब्ध आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून बीएनएचएस ही संस्था मुंबई परिसरात फार मोठ्या प्रमाणावर पक्षी स्थलांतराचा अभ्यास करतेय. मागील वर्षापर्यंत जवळपास दहा हजार पक्ष्यांना वाळे घालण्यात आले अथवा पायात झेंडे (फ्लॅग) बसविण्यात आले आहेत. हयापैकी अनेक पक्षी दुसरीकडे कुठेतरी स्थलांतर करून गेल्याची माहिती हळूहळू उपलब्ध होते आहे.
२०१४ मध्ये पुण्यातील इला फाउंडेशन द्वारा पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी ५२ पक्ष्यांना टॅग केले होते. त्यापैकी भादलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे पंखावर क्रमांक घातलेली पट्टी (विंग टॅग) लावलेला एक राखी बगळा (ग्रे हेरॉन) चार वर्षांनंतर मार्च २०१८ मध्ये २०७ किमी दूर संगमनेर (जि. अहमदनगर) येथे आढळून आला.
या लेखात महाराष्ट्रात स्थलांतर करून येणार्या राजहंस, कलहंस, काळा करकोचा, छोटा तुरेवाला सूरय, मोठा जलरंक, मोठा रोहित व धूसर सूरय ह्या प्रजातीच्या स्थलांतराची अद्ययावत माहिती सादर केलेली आहे. बरेचदा अशी माहिती केवळ संशोधन पत्रांमध्ये सीमित राहते आणि सर्वांना ती सहजी उपलब्ध होत नाही. ही माहिती लेखात उल्लेख केलेल्या अनेक पक्षिमित्रांनी तसेच मी स्वतः प्रकाशित केलेल्या अनेक संशोधन पत्रांमधून घेतलेली आहे.
मंगोलीया ते महाराष्ट्र: राजहंस (बार-हेडेड गूज)
१३ डिसेंबर २००७ रोजी नागपूरचा पक्षी अभ्यासक आदित्य जोशी, सुशांत भुसारी व मला नागपुर जवळच्या पारडगाव तलावावर गळ्यात पिवळी कॉलर लावलेला राजहंस दिसला. आशीष भोपळे ह्या माझ्या मित्राकडे असलेल्या टेलिस्कोपमधून त्या कॉलरवर इंग्रजीत कोरलेले NU हे शब्द आम्ही वाचले. त्यानंतर पुण्याजवळच्या वीर धरणावर १३ जानेवारी २००८ रोजी पक्षी अभ्यासक आदेश शिवकर ह्यांना असाच राजहंस दिसला. त्याच्या गळ्यातील कॉलरवर इंग्रजीत C6 असे कोरलेले होते. मी ह्याच्या स्थलांतराची माहिती मिळविण्यासाठी मंगोलीया येथील वाइल्डलाइफ कंझर्वशन सोसायटीचे पक्षीशास्त्रज्ञ डॉ. मार्टिन गिल्बर्ट ह्यांना ईमेल पाठविला. त्यांनी कळविलेल्या माहितीवरून आम्हाला राजहंसांच्या स्थलांतराची माहिती मिळाली. त्यांनी ह्या (C6) राजहंसाला १८ जुलै २००७ रोजी उत्तर मंगोलीया मधील दारखड व्हॅली येथे पकडून त्याच्या गळ्यात ही लवचिक प्लॅस्टिकची कॉलर बसविली होती.
गूगल अर्थ ह्या संकेतस्थळावरील नकाशाच्या मदतीने आम्ही दारखड ते पारडगाव हे सरळ रेषेतील अंतर काढले असता ३,८१७ किलोमीटर एवढे असून दारखड ते वीर धरण हे अंतर ४,३२७ किमी एवढे आहे.
मंगोलीया मध्ये विण करणारे राजहंस भारतात स्थलांतर करून येतात ह्याचा हा पहिला शास्त्रीय पुरावा होता.
ह्यातील एक राजहंस पुढील किमान चार वर्षे (२०१२ पर्यंत) त्याच्या थव्यासोबत पारडगावच्या तलावावर येत राहिला आणि वृत्तपत्रांमध्ये गाजत राहिला. डॉ. अनिल पिंपळापुरे, श्री गोपाळ ठोसर, स्व. तरुण बालपांडे, अविनाश लोंढे असे आम्ही त्याचा मागोवा घेत राहिलो. नागपुरचे पक्षिमित्र सुरेन्द्र अग्निहोत्री ह्यांना असे आणखी दोन राजहंस आढळून आले. अर्थात ते सुद्धा मंगोलीया येथूनच स्थलांतर करून आल्याचे सिध्द झाले.
दि. ७ मार्च २०१० रोजी डॉ. सुधाकर कुर्हाडे ह्यांना उजनी जलायशयावर (पुणे – सोलापूर) एका पायात G95 क्रमांक कोरलेली हिरवी रिंग असलेला राजहंस आढळून आला. डॉ. न्याम्बायर बातबायर (प्रेमाने नुसतेच न्याम्बा) ह्यांनी राजहंस पक्ष्याच्या पायात ही रिंग दि. २९ जुलै २००९ रोजी (सात महिन्यापूर्वी) मंगोलीया मधील दिद उलान सरोवर येथे घातली होती. विशेष म्हणजे ह्या राजहंसासोबत अॅल्युमिनियमचा वाळा घातलेले आणखी दोन राजहंस सुद्धा होते. पण जोपर्यंत त्या वाळ्यावरील क्रमांक कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या स्थलांतराची खात्रीलायक माहिती मिळवता येत नाही.
दि. १ जानेवारी २०१५ रोजी परत पुण्याजवळील वीर धरणावर पक्षीमीत्र स्वप्नील गिराडे ह्याला गळ्यात RT असा क्रमांक घातलेली नारिंगी कॉलर असलेल्या राजहंस आढळून आला. ह्या राजहंसाला मंगोलीयाच्या बुलगान प्रांतातल्या शारगा (नूर) सरोवरात दि. १५ जुलै २००९ रोजी पकडून कॉलर करण्यात आले होते. तेथील डॉ. मार्टिन गिल्बर्ट हे संशोधन करीत होते. हा राजहंस पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच कुणाला दिसला होता. आपल्या दृष्टीने महाराष्ट्रात स्थलांतर करून येणारे राजहंस मंगोलीया येथूनच येतात असे एक अनुमान वरील सर्व नोंदीनवरून सहज काढता येईल.
त्यानंतर मंगोलियन पक्षितज्ञांनी अनेक संशोधन पत्रे लिहून ही सगळी माहिती जगासमोर मांडली. त्यात राजहंस पक्षी हिमालयाच्या उंच शिखरांवरून (अधिकृतपणे नोंद ६,५४० मीटर अर्थात २१,४६० फूटावरून) भरारी घेऊन भारतात येतात असे सुद्धा आढळून आले आहे. बीएनएचएसच्या पक्षीतज्ञांनी सुद्धा मग राजहंसांच्या पाठीवर ट्रान्समिटर बसवून अधिक संशोधन केले.
मंगोलीया ते गोंदिया: कलहंस (ग्रेलॅग गूज)
दि. २१ जानेवारी २०२१ रोजी पक्षिमित्र मुकुंद धुर्वे सर आणि संदीप गभणे ह्यांना गोंदिया जिल्ह्यातील परसवाडा तलावावर गळ्यात सॅटेलाइट ट्रान्समिटर लावलेला पक्षी दिसला. संदीप गभणे ह्यांनी काढलेली छायाचित्रे व माहिती मंगोलीया येथील प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. न्याम्बा ह्यांना कळविली असता हे सॅटलाइट ट्रान्समिटर पश्चिम मंगोलीया मधील आयरग सरोवरावर त्यांनीच जुलै २०१९ बसविल्याचे कळले. आयरग पासून परसवाडा हे गूगलअर्थच्या नकाशावर सरळ रेषेत जर जोडले तर ३,२५१ किलोमीटर एवढे अंतर आहे !!
रशिया ते अमरावती: काळा करकोचा (ब्लॅक स्टॉर्क)
१० मार्च २०१३ रोजी अमरावती जिल्ह्यातील बासलापूर तलावावर तरुण पक्षिमित्र अशहर खानला (प्रेमाने कृष्णा खान) पायात रंगीत वाळा (पांढरा) असलेल्या काळा करकोचा (ब्लॅक स्टॉर्क) आढळून आला. त्याने घेतलेल्या छायाचित्रात त्यावरचा कोरलेला 605W हा क्रमांक सुस्पष्ट दिसत होता. ह्या पक्ष्याची माहिती मिळविली असता रशिया मधील नोव्होसीबिर्स्क जवळील सुझून येथे डॉ. फ्रांतीसेक पोयर ह्यांनी २१ जुलै २००२ रोजी ह्या पक्ष्याला पकडले होते. झेक प्रजासत्ताकात त्यावेळी रंगीत वाळे टाकून काळ्या करकोच्यांच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू होता. म्हणजे हा करकोचा तब्बल १० वर्षे २३५ दिवसांनी दिसला होता. सुझून ते बासलापूर सरळ रेषेतील अंतर ३,६८४ किलोमीटर एवढे आहे. दरवर्षी जर हा पक्षी बासलापूर (किंवा अमरावतीला) येथे येऊन परत गेला असेल असे गृहीत धरले तर त्याने त्याच्या आयुष्यात आतापर्यंत किमान ७३,६८० किलोमीटर प्रवास निश्चितच केला असणार असे अनुमान काढता येते! खरे म्हणजे काळे करकोचे किंवा इतर अनेक स्थलांतरीत पक्षी साधारणतः सरळ रेषेत प्रवास करीत नाहीत. तसेच ते प्रवासादरम्यान व हिवाळ्यात एकाच ठिकाणाऐवजी आजूबाजूच्या अनेक अधिवासाचा उदरभरणासाठी फायदा उचलतात.
पर्शियाचे आखात ते पश्चिम किनारा: छोटा तुरेवाला सुरय (लेसर क्रेस्टेड टर्न)
दि. ३१ डिसेंबर २००९ रोजी अर्नाळा समुद्र किनार्यावर डी. पी. बॅनर्जी ह्यांना एक मृत छोटा तुरेवाला सुरयमिळाला. त्याच्या पायात Inform British Museum London, SW-DD08695 असे कोरलेला अॅल्युमिनियमचा वाळा घातलेला होता. ह्या पक्ष्याला २७ जून २००८ रोजी कतार आणि बहारिन जवळच्या जारीम ह्या समुद्री बेटावर वाळा घालण्यात आला होता. जारीम ते अर्नाळा थेट अंतर २,४२८ किमी एवढे आहे.
दि. ११ नोवेंबर २०१० रोजी सिंधुदुर्ग येथे प्रसिद्ध पक्षिमित्र भाऊ काटदरे आणि विनोद पाटील ह्यांना पायात वाळा घातलेला मृत छोटा तुरेवाला सुरय मिळाला. त्याच्या पायातील वाळयावर ENVIRONMENT TEHRAN DH2377 असे कोरलेले होते. तेहरान येथील पक्षीतज्ञ हमीद अमिनी ह्यांनी कळविले की ह्या पक्ष्याला १६ जुलै २००६ रोजी त्यांनी इराणमधील नाखिलू बेटावर वाळा घातला होता.
आणखी एक छोटा तुरेवाला सुरय दि. ९ जानेवारी २०१० रोजी अलिबागच्या समुद्रकिनार्यावर पक्षिमित्र डॉ. वैभव देशमुख ह्यांना मिळाला होता. त्याच्या पायातील वाळयावर ENVIRONMENT TEHRAN DW07196 त्याच्या असे कोरलेले होते. ह्या पक्ष्याला सुद्धा पक्षीतज्ञ हमीद अमिनी ह्यांनीच ९ ऑगस्ट २००९ रोजी इराणमधील नाखिलू बेटावर वाळा घातला होता.
ह्या तिन्ही सुरय पक्ष्यांना ते घरट्यात पिल्लू अवस्थेत असतानाच (म्हणजे उडता येण्यापूर्वी) पकडून पायात वाळे टाकण्यात आले होते. तिन्ही सुरय महाराष्ट्राच्या समुद्र किनार्यावर मरण पावले. अर्नाळ्याचा सुरय एक वर्ष सात महीने, सिंधुदुर्गचा चार वर्षे तीन महीने तर अलिबागचा सुरय केवळ पाच महीने जगला होता. वाळा टाकण्याच्या स्थळापासून तर तो पक्षी परत मिळालेल्या दोन ठिकाणांमधील सरळ रेषेतील अंतर काढले असता अनुक्रमे २,४२८ किमी, २,५९९ किमी आणि २,४०० किमी असल्याचे आढळून आले. हे सुरय पक्षी पर्शियाच्या आखातातील बेटांवर विण करतात. विण संपल्यानंतर आपल्या समुद्री जीवनाच्या प्रवासाला निघतात. त्यातील बरेच पक्षी मग भारताच्या समुद्र किनार्यावर विणीबाहेरील काळ व्यतीत करण्यासाठी येतात. अर्थात त्यामध्ये मृत्युदर नक्कीच जास्त असतो. मी स्वतः अलिबागच्या आक्षी समुद्रकिनार्यावर पायात वाळा असलेले किमान तीन छोटे तुरेवाले सुरय छायाबद्ध केले आहेत. पण वाळ्यावरील क्रमांक जोपर्यंत वाचला जात नाही तोपर्यंत त्याच्या स्थलांतराची निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकत नाही.
चीन ते चिंचणी – नॉट आऊट आणि यालूजियांग ते अलिबाग: मोठा जलरंक (ग्रेट नॉट)
दि. १८ ऑगस्ट २०१६ रोजी चिंचणीच्या (ता. डहाणू, जि. पालघर) समुद्र किनार्यावर पक्षिमित्र आशीष बाबरे ह्यांना उजव्या पायात झेंडे (फ्लॅग) असलेला एक मोठा जलरंक आढळून (ग्रेट नॉट) आला. छायाचित्रे काढली असता दोन झेंडे असून वरील झेंडा काळा व खालील झेंडा पांढरा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच पक्ष्याच्या डाव्या पायात वाळा सुद्धा घातलेला होता. प्रत्येक देशातील पक्ष्यांना पायात झेंडे लावण्याची नियमावली (प्रोटोकॉल) आहे. ती बघितल्यास हा पक्षी पूर्व चीन मध्ये चिन्हांकित करण्यात आला असे समजले. संपर्क केला असता चीनमधील नॅशनल बर्ड बॅंडिंग सेंटरच्या श्रीमती चेन लिक्सिया ह्यांनी माहिती पाठविली. ह्या पक्ष्याला डॉ. मा ह्यांच्या चमूने २००६ नंतर कधीतरी चोंगमीन दोंगतान नेचर रिझर्व, शांघाय अर्थात यांगत्झे नदीच्या मुखाशी पकडून चिन्हांकित केले होते. चीन ते चिंचणी नॉट आऊट अशा ह्या प्रवासाचे सरळ रेषेतील अंतर ५,०७२ किमी एवढे प्रचंड आहे.
दि. ८ नोवेंबर २०२० रोजी पक्षिमित्र अविनाश भगतला अलिबाग (जि. रायगड) जवळच्या आक्षि समुद्र किनार्यावर उजव्या पायात दोन रंगीत झेंडे असलेला मोठा जलरंक आढळून आला. हाच पक्षी मला व चि. वेदांतला दि. २२ व २३ डिसेंबर रोजीसुद्धा तेथेच आढळून आला. वरील झेंडा हिरवा तर खालील झेंडा नारिंगी होता. डाव्या पायात अॅल्युमिनियमचा वाळा होता. ह्या पक्ष्याला चीनच्या पक्षीतज्ञांनी यालूजियांग (लिवनिंग प्रांत) ह्या चीनच्या पूर्व किनार्यावरील पाणथळ जागी दि. २६ ऑगस्ट २०२० रोजी चिन्हांकित केले होते. म्हणजे केवळ ७५ दिवसांनी तो इथे दिसून आला. यालूजियांग ते अलिबाग सरळ रेषेतील अंतर ५,४२५ किमी एवढे आहे. त्यानंतरही हा पक्षी अनेक दिवस इथे मुक्कामी होता.
रोहिताची राजस्थान वारी – मुंबई ते चेन्नई आणि राजस्थान: (ग्रेटर फ्लेमिंगो)
दि. ३ एप्रिल २०२१ रोजी जगदीशन नावाच्या पक्षिमित्राला चेन्नईच्या (तामिळनाडु) पल्लीकरणी पाणथळीवर 4AP क्रमांकाचा रंगीत वाळा टाकलेला मोठा रोहित आढळून आला. हाच रोहित जुलै २०२० मध्ये तामिळनाडुच्या शोलिंगानल्लुर पाणथळीवर आढळला होता. ह्या पक्ष्याला दि. २४ ऑक्टोबर २०१८ ला बीएनएचएस द्वारा पाणजेच्या (नवी मुंबई, महाराष्ट्र) पाणथळीवर पायात रंगीत वाळा घालण्यात आला होता. नवी मुंबई येथेच बीएनएचएस द्वारा पायात रंगीत वाळा घातलेला आणखी एक मोठा रोहित राजस्थानच्या सांभरच्या खार्या सरोवरात मेलेला आढळला.
सेशेल्स ते वसई – समुद्रावरील मुशाफिरी: धूसर सुरय (सूटी टर्न)
दि. २७ जुलै २०२० रोजी श्री नितीन परब यांना वसई (जि. पालघर) जवळच्या परमार टेक्नो सेंटरच्या परिसरात एक धूसर सुरय (सूटी टर्न) गलीतगात्र अवस्थेत आढळून आला. त्याच्या पाठीवर छोटेसे यंत्र अर्थात जीपीएस लॉगर (GPS logger) लावलेले होते. त्यांनी हा पक्षी जवळच्या वळीव येथील पोलीस स्टेशनल सुपूर्द केला. तेथून तो बोरिवली (जि. मुंबई) येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथे उपचारासाठी पाठविण्यात आला. येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जीपीएस लॉगर वर 183016 हा क्रमांक होता. वरील बाजूस सौर ऊर्जेचे चार्जिंग पॅनल असून खालील बाजूस डॉ. ख्रिस्तोफर फेरे ह्यांचा ईमेल दिलेला होता. उजव्या पायात असलेल्या अॅल्युमिनियमच्या वाळ्यावर (रिंग) टाकलेला क्रमांक DT 75528. BTONHMSEUM LONDON. SW.WWW.NNG.AC असा होता. गूगल सर्च करताच ही रिंग लंडन (इंग्लंड, यू.के.) येथील ब्रिटिश ट्रस्ट ऑफ ओर्निथोलॉजी (बीटीओ) ह्या संस्थेने त्यांना उपलब्ध करून दिली होती असे स्पष्ट झाले. बोरिवली येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री विजय बारब्दे ह्यांनी जीपीएस लॉगर वर घातलेल्या डॉ. ख्रिस्तोफर फेरे ह्यांच्या ईमेलवर संपर्क साधला.
सेशेल्स हे बेट आफ्रिका खंडाच्या पूर्व दिशेला हिंद महासागरात असून या ठिकाणी बर्ड आयलँड वर अनेक समुद्र पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर वीण होते. डॉ. क्रिस्तोफर आणि त्यांची चमू गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रातील अशा सुदूरच्या बेटांवर विण करणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास करीत आहे.
डॉ. ख्रिस्तोफर ह्यांच्या चमूने दि. २७ ते ३० ऑगस्ट २०१९ दरम्यान धूसर सुरयाच्या एकूण १५ पिल्लांच्या पाठीवर जीपीएस लॉगर यंत्रे बसविली होती. ह्यातील १३ पक्षी एका महिन्यात त्यांच्या जन्मस्थळापासून १,००० किमी दूरपर्यंतच्या परिसरात अथांग समुद्रावर – विशेष करून अरबी समुद्रात विहरत होते. मी वसईला मिळालेल्या सुरय पक्ष्याच्या स्थलांतराचा नकाशा तयार केला तेव्हा असे लक्षात आले की सेशल्स बेटा पासून वसईचे सरळ रेषेतील अंतर ३,२२८ किलोमीटर एवढे आहे. अर्थात समुद्रीपक्षी सरळ रेषेत कधीच उडत नसतात तर ते समुद्रावरील हवामानाचा अंदाज घेऊन मुशाफिरी करीत असतात. डॉ. क्रिस्तोफर यांची चमू धूसर सुरयची पिल्लं ज्यावेळेस घरट्यातून उडून जाण्यासाठी सज्ज होतात (पण उडू शकत नाहीत) त्यावेळेस त्यांना पकडून त्यांच्या पाठीवर ट्रान्समीटर बसवितात तसेच पायात वाळे घालतात.
डॉ. क्रिस्तोफर ह्यांनी त्यांच्या ब्लॉगवर टाकलेली माहिती अशी की ऑगस्ट २०१९ मध्ये पाठीवर जीपीएस लॉगर लावलेल्या ह्या सुरय पक्ष्याने ऑगस्ट महिन्याच्या शेवटी बर्ड आयलँड सोडले. त्याच्यासोबत टॅग केलेल्या इतर १५ सुरय पक्ष्यांप्रमाणेच तो बर्ड आयलँडच्या (सेशेल्सच्या) उत्तरेला अथांग अरबी समुद्रात मुशाफिरीला निघाला. पुढे हजारो किलोमीटरची मजल मारीत हिन्दी महासागराच्या वायव्येला झेपावत त्याने सोमालीया, केनिया, आणि उत्तर टांझानियाच्या किनार्यलगतच्या समुद्रात विहार केला. १३ जुलै २०२० ला सोकोत्रा बेटापासुन ४५० किलोमीटर पूर्वेला तो होता. त्यानंतर मात्र पूर्वेकडे वाहणार्या जोरदार मोसमी वादळाच्या तडाख्यात तो सापडला. त्याने वादळ टाळण्यासाठी पूर्वेकडे अर्थात भारताच्या पश्चिम किनार्याकडे उडायला सुरुवात केली. पण वादळी हवामानाने त्याचा पिच्छा सोडला नाही. त्यामुळे अगदी थकलेल्या अवस्थेत त्याला वसईचा किनारा गाठावा लागला. अर्थात पुढे काय घडले ते वर दिले आहे.
स्थलांतरित पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करतात असा आपला समज असतो. अनेक पक्षी वेगळ्या मार्गावर मुशाफिरी करतात त्याचे हे उदाहरण!! ये लेखात केवळ मोजक्याच पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती दिलेली आहे.
(पूर्व प्रसिद्धी: मराठी विज्ञान परिषद पत्रिका मासिक )
डॉ. राजू कसंबे बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी येथे सहायक संचालक आहेत. त्यांना पक्षी, फुलपाखरे, तसेच पर्यावरण शिक्षण ह्या विषयात रुचि आहे.
Very nice information.
Very nice information, In future, the parties should have a flag event at Hatnoor Reservoir.